आपण रोज घरात बरीच रसायने वापरतो. भारतातल्या बहुतांश नद्यान्मध्ये प्रदूषण आहे ते घरगुती आहे, म्हणजे आपल्या घरातून गेलेले आहे.
डॉ. प्रमोद मोघे ह्यानी सांगितले, आपण प्रत्येक जण रोज सुमारे 40 mg इतकी रसायने वापरतो. पुणे शहराची लोकसंख्या 50 लाख इतकी धरली, तर 0.04 kg x 50,000, म्हणजे 2 लाख किलो इतकी रसायने रोज आपल्या नदीत जातात.
आम्ही “रसायन-विरहित जीवनशैली” ह्या विषयावर presentations घेत होतो. सोसायटी, मंडळे, कॉर्पोरेट, विविध संस्था आणि गट यान्मर्फत लोकांपर्यंत पोहोचत होतो.
एका काचेच्या बाऊल मध्ये, पाणी घालून, टूथपेस्ट, साबण, शाम्पू, कपडे धुण्याचा साबण, भांडी घासायचा साबण, फरशी पुसायची रसायने, अशी सगळी मिसळून पाण्याची अवस्था काय होते ते दाखवायचो, त्याचा बदललेला रंग, त्यावर आलेला फेस.
सुमारे 10 लाख घराम्नमधून अशी रसायने आल्यावर नदीचे काय होत असेल, पुण्याच्या पुढच्या गावांना हे असे पाणी प्यावे लागते, त्यांचा विचार करा, हे सांगायचो. शिवाय हे सर्व प्रदूषण मुळा-मुठेद्वारे भीमेत, आणि भीमेतून, तिच्यावरच्या सोलापूर येथील उजनी धरणात साठते हेही सांगायचो. आपण प्रदूषित केलेल्या पाण्यामुळे, उजनी परिसरात लोकांना अनेक आरोग्याच्या समस्याना सामोरे जावे लागत आहे, हे ऐकून लोकाना वाईट वाटायचे, आपण काहीतरी केले पाहिजे असेही वाटायचे.
आम्हाला लोकांच्या प्रतिक्रिया बघून आपले presentation यशस्वी झाले असे वाटायचे.
Presentation प्रभावी होणे हा एक भाग झाला. पण presentation चे उद्दिष्ट होते लोकांना नदी प्रदूषणातल्या आपल्या सहभागाची माहिती देणे, आणि हे प्रदूषण कमी कसे करू शकतो, ह्य बद्द्ल मार्ग दाखवणे.
पण हा बदल काही घडून येताना दिसत नव्हता.
मग परत विचार करण्याची वेळ आली. आणि लक्षात आले, आपण “selfish gene” ला हात घालणे गरजेचे आहे.
शहरातून वाहणार्या नदीचे पाणी आपण पित नाही हे सगळ्याना माहित आहे. पुण्याच्या बाबतीत बोलायचे तर, पुण्याला 4 धरणातून पाणी पुरवठा होतो, दोन खुद्द मुठेवर, आणि दोन, अम्बी आणि मोशी ह्या तिच्या उपनद्यांवर. ही चार ही धरणे पुण्याचा upstream ला म्हणजे नदीप्रवाहाच्या वरच्या बाजूला आहेत.
म्हणजेच पुण्यात नदी प्रदूषित झाली तरी ते प्रदूषित पाणी पुणे शहरातल्या लोकांना प्यावे लागत नाही.
आपल्यामुळे नदी प्रदूषित होते हे कळले, उजनी मधल्या लोकांना आपल्यामुळे त्रास होतो हे कळले, तरी वाईट वाटण्यापलिकडे त्यातून काहीच निष्पन्न होणार नाही.
लोकांना अपराधी वाटावे, हा तर आमचा उद्देश नव्हता. तर त्यातून पुढे जीवनशैलीत बदल घडून यावा हा आमचा उद्देश होता.
मग आमच्या लक्षात आले की आपण मुलभूत मानवी स्वभाव लक्षात घेतला नाही. लॉजिक हे बदल घडवून आणू शकत नाही, त्यासाठी भावनेला हात घालणे गरजेचे आहे.
साधे बघा ना, फरशी पुसायच्या रसायनाच्या जाहिरातीत, आपल्याला फरशीवर आक्राळ-विक्राळ “बॅक्टेरिया” दाखवले जातात. त्याचा परिणाम म्हणजे आपण फरशी पुसायला नुसते पाणी न वापरता, ही रसायने पाण्यात घालतो. आता, ही एवढी तीव्र रसायने वापरावीत एवढे आपले घर खरेच अस्वच्छ असते का? आणि सगळेच बॅक्टेरिया खरेच एवढे भयंकर आहेत का की त्यांना नष्ट करून टाकावे?
पण आपली लहान मुले जिथे वावरतात तिथे ते जाहिरातीत दाखवतात तसे जंतू नकोत हा आपला विचार असतो. म्हणजेच जाहिरातदारानी बरोब्बर भावनेला हात घातला आहे.
आपणही तेच केले पाहिजे हे आमच्या लक्षात आले. म्हणजे जाहिरातींसारखी, अर्धवट किंवा अतिरंजित माहिती द्यायची नाही. परंतु कशावर जास्ती भर द्यायचा हे कळले. माहिती तर सर्व होतीच, फक्त presentation मध्ये बदल करायचा होता.
आपल्या रोजच्या वापरातल्या उत्पादनान्मध्ये जी रसायने आहेत, ती बरीचशी मानव-निर्मित आहेत आणि त्यातली काही आपल्या आरोग्याला घातक आहेत. त्यातल्या काहीन्मुळे कॅन्सर होऊ शकतो, यकृत/ मूत्रपिंडावर विपरित परिणाम होऊ शकतो, काहीन्मुळे हार्मोनल समस्या उद्भवू शकतात.
मानव-निर्मित असल्याने, ही रसायने एकदा का पर्यावरणात गेली ती पुढची अनेक वर्षे (काही हजार सुद्धा) तशीच राहणार आहेत. कारण त्यांचे विघटन निसर्गात होणार नाही.
आपल्या शहरातून पुढे जाणार्या नदीचे पाणी शेतीसाठी वापरले जाते. हयाच पाण्यावर आपला भाजीपाला- पिके होतात. पाणी आणि माती ह्यांचा एकत्रित विचारच करावा लागतो. ते तसे वेगळे रहात नाहीत. पाण्यामधून हीच रसायने, जमिनीत जातात, त्यात वाढणार्या पिकान्मध्ये शोषली जातात, आणि आपल्या अन्नावाटे आपल्याच पोटात जातात.
चित्र: जुईली ठाकूर
जी रसायने आपल्या घरातून नदीत जातात, तीच घातक रसायने अन्नावाटे आपल्या मुलांच्या पोटात जातात.
ही गोष्ट लोकांसाठी धक्कादायक होती. आता हा, तिकडे उजनी परिसरात राहणार्या लोकाचा प्रश्न उरला नाही. हा आपल्या सगळ्यांच्या आरोग्याचा प्रश्न झाला.
शिवाय अनेक ठिकाणी ह्याच पाण्याने भाजी धुतली जाते. त्याचे फोटो ही आम्ही presentation मध्ये सामील केले. जीवितनदी सदस्य जेंव्हा सांगायचे, की अशा रसायन-युक्त सांडपाण्याने धुतलेल्या भाजीवर माशासुद्धा बसत नाही, तेंव्हा लोक अंतर्मुख व्हायचे.
प्रात्यक्षिकासाठी वापरलेल्या त्या रसायनयुक्त पाण्याच्या बाऊल कढे आता वेगळ्या काळजीने लक्ष जायचे. त्या आधी, अरेरे, हे पाणी उजनी परिसरातल्या लोकांना प्यावे लागते, म्हणून केवळ हळहळ असायची. आता त्याची जागा, ह्या पाण्यावर आपला भाजीपाला पिकतो? हे अन्नातून आपल्या पोटात जाते? ह्या भयंकर जाणीवेने घेतली.
आणि आम्हाला अपेक्षित परिणाम दिसू लागला. आपण काय करू शकतो, ही रसायने कशी कमी करू शकतो? त्यांना काय पर्याय आहेत, हे प्रश्न येऊ लागले.
अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा होता आणि आहे, पण बदलाची सुरुवात होऊ लागली. आपली जीवनशैली बदलणे गरजेचे आहे, त्याशिवाय हे दुष्ट्चक्र थांबणार नाही हे कळू लागले.
एक bigger picture लोकांना दिसू लागले. आत्तापर्यंत नदी प्रदूषणात आपलाही काही सहभाग आहे हे माहित नव्हते; आपल्या घरातून वापरलेले पाणी कुठे जाते, हा विचारच केला नव्हता; आपण घरात काय काय रसायने वापरतो, किम्बहुना आपण रसायने वापरतो हेच माहित नव्हते; त्याची लख्ख जाणीव होऊ लागली.
तो आमच्यासाठी एक युरेका क्षण होता. आधीच्या चाचपडण्याच्या टप्प्यातून हा टप्पा निश्चितच आश्वासक होता.
पण तोही क्षणिक होता. हा टप्पा गाठला ठीक आहे, पण अजूनही पुरेसे नाही हा विचारही येऊ लागला आणि आत्ताच्या योजनेतील कमतरताही लवकरच जाणवू लागल्या. त्याबद्दल पुढच्या ब्लॉग्जमध्ये. आत्ता तरी हा युरेका क्षण उपभोगून घेऊयात 😊
- अदिती देवधर – संस्थापक – संचालक जीवितनदी लिव्हिंग रिव्हर फाऊंडेशन
Leave a Reply