पुण्याच पाणी (#९)
दररोज कमीतकमी ४०-५० कोटी लिटर प्रक्रिया न केलेलं मैलापाणी पुण्यातील नद्यांमधून वाहत पुढील गावांमध्ये जात. या पाण्यामध्ये फक्त मानवी मलमूत्र एवढंच नसून, आपण रोज वापरत असलेले साबण, डिटर्जंट, फरशा आणि बाथरूम साफ करण्याची रसायने, सौंदर्य प्रसाधने अशा असंख्य गोष्टींचे एक अतिविषारी कॉकटेल असत. मुळा-मुठा नद्यांचा पुढे भीमा नदीशी संगम होऊन अखेर हे पाणी उजनी धरणात पोहोचत. या प्रवासात अनेक छोटीमोठी गाव आणि खेडी आहेत.
पुण्यातून रोज जे प्रदूषित पाणी येत त्यावर या भागातील लोकांचं जीवन अवलंबून आहे. परवडत नसतानाही अनेकांना फिल्टर, आर. ओ सारख्या गोष्टी वापरण्याशिवाय गत्यंतर नाही. अनेकांना हे परवडत नसल्याने दूषित पाण्यामुळे होणारे सर्व परिणाम हताशपणे भोगण्याशिवाय यांना पर्यायच नाही! यात अपचन, डायरिया, कावीळ इथपासून कर्करोगांपर्यंत आजार उद्भवू शकतील असा या पाण्याचा दर्जा आहे. फक्त दोन मिनिटे विचार करून बघा की आज आपल्या नदीमध्ये जस पाणी दिसत, ते जर आपल्या घरी नळाला यायला लागलं तर काय होईल? नुसत्या कल्पनेनीसुद्धा अंगावर काटा येतो. पण या गावांमध्ये तर ही प्रत्यक्ष परिस्थिती आहे. त्यामुळे रोगराई प्रचंड प्रमाणात आहे. दर घरटी दूषित पाण्याचे कोणी न कोणी बळी भेटतील.
या पाण्यामुळे तिथे असलेल्या पशुपालन व्यवसायावरही गंडांतर आले आहे. जनावरांची प्रजोत्पादन क्षमता घटली आहे, गर्भपाताचे प्रमाण प्रचंड आहे. जनावरांच्या दुधाला घाणेरडा वास येतो त्यामुळे दुग्धव्यवसाय संकटात आहे.
आणि या सर्व परिस्थितीला कारणीभूत एकच गोष्ट आहे – पुण्याचं पाणी!
या सर्व गावांचा आणि तिथे राहणाऱ्यांचा काय दोष? असेलच तर तो म्हणजे ते पुण्याच्या नंतर राहतात.
एके काळी आपल्या देशासाठी अतुलनीय योगदान देणारे शहर म्हणून पुण्याचा लौकिक होता आणि आजही आपण तो अभिमानाने मिरवतो. छत्रपतींनी केलेली हिंदवी स्वराज्याची पायाभरणी, केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावरच नाही तर अटकेपार भगवा फडकवण्याचा पराक्रम, भारतीय स्वातंत्र्य युद्धातील ब्रिटिशविरोधी असंतोषाचे जनकत्व, अस्पृश्यता निवारणाची क्रांती, स्त्री शिक्षण अशा बहुआयामी दैदिप्यमान योगदानानी पुण्याचं पुणेपण आजवर अधोरेखित होत राहिलेलं आहे.
पण २१व्या शतकामध्ये या दूषित आणि विषारी पाण्याचं हे योगदान आपण पुढील गावांना देत आहोत ते बघितलं की अपराधिपणानी आणि शरमेनी मान खाली जाते…
या पाण्याचा त्रास फक्त पुढील गावांना होतो अस नाही. आपण पुणेकरही तो अप्रत्यक्षपणे सहन करतोय. कसा? ते पुढील भागात पाहू
-मनीष घोरपडे (एक नदीप्रेमी पुणेकर)
Leave a Reply