पुण्याचं पाणी #४
मागील भागात धरणे 100% भरूनही उन्हाळ्यात पाण्याची रडारड का होते हा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाकडे जाण्याआधी, वितरण व्यवस्थेतील गळतीचे पाण्याच्या नासाडीपलिकडील काही आणखी गंभीर परिणाम समजून घेणे इष्ट ठरेल.
गळतीचे एक महत्वाचे कारण म्हणजे 40 वर्षांपेक्षा जुन्या पाईपलाईन अनेक भागात आहेत. यातील बऱ्याच लोखंडी (GI) आहेत आणि कालानुरूप त्या गंजल्या असण्याची शक्यता आहे.
आपल्या सर्वांना माहीत आहे की पाण्याच्या शुद्धीकरणासाठी पाण्यात क्लोरीन वायू मिसळला जातो. आणि त्यातील बराच अंश प्रक्रियेनंतरही पाण्यात राहतो. हे क्लोरीनयुक्त पाणी गंजलेल्या पाईपलाईनमधून वाहते तेव्हा लोखंडाचा गंज आणि क्लोरीन यांची रासायनिक प्रक्रिया होऊन मग ते आपल्या घरी येते!
तसच, बऱ्याच ठिकाणी सांडपाणी वाहिन्या आणि पाणीपुरवठा वाहिन्या अगदी जवळ जवळ असतात. सांडपाणी वाहिन्यांची अवस्था हीसुद्धा वाईट असल्याने यातील सांडपाणी बाहेर पडून या सगळ्या वाहिन्यांच्या जागी सांडपाण्याची तळी झालेली सुध्दा कधी कधी पाहायला मिळतात. त्यामुळे यातील सांडपाणीसुद्धा पाणीपुरवठ्याच्या वाहिनीत मिसळू शकते. अनेकदा नागरिक अचानक नळाच्या पाण्याला घाण वास येतोय अशी तक्रार करतात.
जेव्हा जैविक पदार्थ युक्त सांडपाण्याची क्लोरीनयुक्त शुद्ध पाण्याबरोबर प्रक्रिया होते तेव्हा trichloromethane, chloroform अशी अत्यंत घातक (carcinogenic) रसायने तयार होतात ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो!
त्यामुळे वितरण व्यवस्थेतील गळतीचा नागरी आरोग्याशी सुद्धा घनिष्ट संबंध आहे. गळतीने पाणीही वाया जातंय आणि आरोग्यही धोक्यात येतंय. त्यामुळे गळती रोखणे हा पुण्याच्या कारभाऱ्यांचा पहिला अजेंडा असला’च’ पाहिजे.
धरणे भरूनही पाणी न पुरण्याचा प्रश्न पुढच्या भागात पाहू.
-मनीष घोरपडे (एक नदीप्रेमी पुणेकर)
Leave a Reply