पुण्याच पाणी (#३)
मागील पोस्ट मध्ये विचारलेले प्रश्न – पुण्याला दर माणशी दर दिवशी किती पाणीपुरवठा होतो? पुणेकर जास्त पाणी वापरतात (का नासतात?) हे सर्रास केल जाणार विधान तुम्हाला बरोबर वाटत का? जर तुम्ही आम्ही सांभाळून पाणी वापरतो तर मग पाणी जात कुठ?
याबद्दलची निश्चित उत्तरं शोधण हे एक दिव्य काम आहे! पुणे शहराला ९०० ते १२०० MLD (दशलक्ष लिटर प्रतिदिन) म्हणजे आईच्या भाषेत ९० ते १२० कोटी लिटर दररोज इतके पाणी पुरवले जाते. मनपा, जलसंपदा खाते आणि वेगवेगळ्या तज्ञ संस्था वेगवेगळे आकडे देतात. पण म्हणुनच ही एक रेंज मानायला हरकत नाही. जर लोकसंख्या ४५ ते ५० लाख मानली तर २०० ते २४० लिटर प्रति माणशी प्रतिदिन असा हिशोब येतो. प्रतिदिन प्रति माणशी २०० लिटर पाणीपुरवठा असावा असे आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय मानके सांगतात. आणि त्या दृष्टीने पुण्याला होणारा पाणीपुरवठा हा आदर्श असेच म्हणायला लागेल.
पण यातील किती पाणी आपल्यापर्यंत प्रत्यक्ष पोहोचते? पालिकेने वेळोवेळी दिलेल्या कबुलीजबाबात ४०-५०% पाण्याची गळती होते हे मान्य केले आहे. अगदी ४०% हा आकडा खरा मानला तरी मग प्रतिमाणशी प्रतिदिन २००-२४० चा आकडा डायरेक्ट १२०-१४४ च्या घरात येऊन पोहोचतो. अर्थात बाकीच्या शहरांची स्थिती पाहता हा आकडा सुद्धा काही वाईट नाही. पण यावरूनच कळते कि पुणेकर पाणी वाया घालवतात या विधानाला काहीही आधार नाही. कारण वाया घालवण्या इतकं पाणी पुणेकरांना मिळतच नाही. अर्थात नियमाला अपवाद सगळीकडेच आहेत. सकाळ संध्याकाळ ओटे धुणारे, नळ्या लावून गाड्या धुणारे, वर्षानुवर्षे वाहणाऱ्या आणि गळणार्या टाक्या दुरुस्त न करणारे, दुष्काळाच्या बातम्या वाचत बागेला अळी ऊतू जाईपर्यंत पाणी देणारे ‘जल-सजग’ नागरिक आपण बघतोच. साध्या साध्या गोष्टींवरून पुणेरी शालजोडीतले लोकांना मारत हिंडणारे अस्सल पुणेरी, या गोष्टींवर मात्र खूप कमी वेळा टिप्पणी करतात याचा मात्र खेद आहे.
या गोष्टीची अजून एक बाजू आहे. जर पाण्याची गळती शून्यावर आणली तर सध्याच्या पाण्याच्या उपलब्धतेत दोन वर्षे निघू शकतात! किंवा जवळ जवळ दुप्पट लोकसंख्या झाली तरी पुणे शहर (म्हणजे पुण्याला पुरवठा करणाऱ्या नद्या!) त्याला पाणी पुरवू शकते.
हि अक्षम्य नासाडी मात्र आम्ही पुणेकर निवांतपणे सहन करतो कारण या नासाडी नंतर उरलेले पाणीही सध्या आपल्याला पुरेसे आहे. त्यामुळेच हि नासाडी रोखणे, गळती थांबवणे या गोष्टी कुठे प्रशासनाच्या कार्यक्रमात दिसत नाहीत न कुठे कुठल्याही पक्षाच्या जाहीरनाम्यात दिसतात. फक्त ‘आम्ही पुणेकरांचे पाणी पळवू देणार नाही’ अशा गर्जना मात्र दर वर्षी केल्या जातात. असो!
वरील विवेचनावरून एक गोष्ट तर स्पष्ट आहे कि पुण्यामध्ये पाण्याची मुबलक उपलब्धता आहे. टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पडणारा भरपूर पाऊस आणि या धरणांची साठवण क्षमता यांचा तो परिणाम आहे.
तरीही काही प्रश्न उत्पन्न होतातच. धरणे १००% भरूनही एप्रिल-मे मध्ये पाण्याची रडारड का होते? एखाद्या वर्षी पावसानी दगा दिला तर पुणेकरांकडे पाण्यासाठी आज काय पर्याय आहेत? विचार करा!
या प्रश्नांचा धांडोळा पुढच्या पोस्टमध्ये घेऊच.
-मनीष घोरपडे (एक नदीप्रेमी पुणेकर)
Leave a Reply