Punyache Pani #2

पुण्याच पाणी (#२)

मागील पोस्ट मध्ये विचारलेले प्रश्न – आपण पुणेकर नक्की कोणत्या नदीचे पाणी पितो? मुळा कि मुठा? पुण्यात किती नद्या आहेत? पुण्याला पाणीपुरवठा करणारी कोणती धरणे आहेत? ती धरणे कोणत्या नदीवर बांधलेली आहेत?

पहिल्यांदा पुण्यात किती नद्या आहेत यावर विचार करू. मुळा आणि मुठा हे ठरलेलं उत्तर आहेच.पण गम्मत अशी आहे कि जागतिक प्रश्नांची सखोल जाणीव आणि अभ्यास असलेल्या पुणेकरांना जर जवळच्या नदीकिनारी नेऊन विचारलं कि हि मुळा आहे का मुठा? तर नक्की सांगता येत नाही. याबाबत आमच्या ‘ठाम’पणाची पुरती विकेट उडते. असो यावर अधिक सविस्तर पुढे कधीतरी.

सध्या पुण्यात किती नद्या आहेत याकडे वळू. तर सध्याच्या PMC-PCMCच्या हद्दींचा विचार केला तर पुण्यात ५ नद्या आहेत – मुळा, मुठा, पवना, रामनदी आणि देवनदी. आपण शाळेत शिकलोय कि ५ नद्यांचा प्रदेश म्हणून पंजाब (पंच आब) हे नाव पडलं आणि आपल्या देशातील तो अतिशय सुपीक प्रदेश म्हणून ओळखला जातो. ज्या शहरात पाच नद्या आहेत त्याला काय म्हणावे? पुणेकर नशीबवान आहेत ते यामुळेच! पण आम्ही कोणत्याच गोष्टीच फाजील कौतुक करत नाही त्यामुळे आमच्या शहरात ५ नद्या आहेत हे आमच्यापैकी बहुतेक जणांना माहीतच नाहीये!

आता या ५ नद्यांमधल्या नक्की कोणत्या नदीचे पाणी आपण पितो? पुणे शहर परिसरात राहणारे नागरिक हे मुठा नदीचे पाणी पितात. या नदीवर टेमघर धरण आहे (जे लवासाला जाताना आपल्याला दिसतं). अंबी आणि मोसेनदी(मोशी) या मुठा नदीच्या उपनद्या आहेत. आणि त्यावर पानशेत आणि वरसगाव हि धरणे आहेत. पुढे यांचे प्रवाह मुख्य मुठा नदीला येऊन मिळतात आणि सर्वात शेवटी आपले खडकवासला. खडकवासला धरणातून पुण्यासाठी पाणी पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते आणि शुद्धीकरण झाल्यावर शहरात पुरवले जाते. शुद्धीकरणाची इतरही केंद्रे आहेत जिथे हे पाणी धरणाचे पाणी पोहोचवले जाते.

आपल्या उद्योग नगरीत (पिंपरी चिंचवड) राहणाऱ्या नागरिकांना मुख्यत्वे पवना नदीचे पाणी पुरवले जाते – पवना धरणामधून.

यावरूनच पुढचे काही प्रश्न सुचलेत –

पुण्याला दर माणशी दर दिवशी किती पाणीपुरवठा होतो? पुणेकर जास्त पाणी वापरतात (का नासतात?) हे सर्रास केल जाणार विधान तुम्हाला बरोबर वाटत का? जर तुम्ही आम्ही सांभाळून पाणी वापरतो तर मग पाणी जात कुठ? थोडं गणिती आहे, पण हि आकडेमोड केली तर काही ‘रहस्य’ उलगडू शकतील! उत्तरांची आणि प्रतिक्रियांची वाट बघतो…

-मनीष घोरपडे (एक नदीप्रेमी पुणेकर)

Leave a Reply

Leave a Reply

  Subscribe  
Notify of