पुण्याच पाणी (#१)
पुणेरी माणसाचा स्वभाव असा का? कारण तो मुळा-मुठा नदीचे पाणी पितो.त्यामुळे कोणत्याही विषयाचा ‘मुळा’पासून अभ्यास करण्याची सवय आणि त्यामुळे भूमिकेत आलेला आड’मुठे’पणा !
मी स्वतः पक्का पुणेरी असल्यामुळे मला हा विनोद न वाटता पुणेरी स्वभावाचे यथार्थ वर्णन वाटते आणि हे नक्कीच एका पुणेकर व्यक्तीनेच लिहील असणार याची खात्री वाटते. ज्या नद्यांच्या नावावरून पुणेरी माणूस आपल्या स्वभावाच यथार्थ वर्णन करतो त्या नद्यांची अवस्था मात्र गेल्या ३०-४० वर्षात अत्यंत दयनीय झालेली आहे. आणि याची सल खऱ्या पुणेकर माणसाला कायमच आहे. ‘सकाळ’मधल्या वाढत्या नदी प्रदूषणाच्या बातम्या वाचून पुणेकर हळहळत असतात.
पण आपण काय करू शकतो? अशा विचाराने हतबल होऊन विषय सोडून देतात.
परंतु मनात आणल तर सर्वसामान्य पुणेकर (खरतर पुणेकर कोणत्याच दृष्टीने सामान्य नसतात!) नागरिकच हि परिस्थिती बदलू शकतात. जगभरातील नद्यांच्या पुनरुज्जीवनाच्या कथा बघितल्या तर एक धागा समान दिसतो. तो म्हणजे नागरिकांचा या प्रयत्नात असलेला सहभाग, त्यांचे नदीवरील प्रेम आणि नदी पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याची त्यांनी दाखवलेली तयारी. आणि जगाच्या गोष्टी सोडून द्या , मुळात पुणेकरांनी एखादी गोष्ट ठरवली तर काय अशक्य आहे?
पण हे करायचं तर आपल्या मुलभूत स्वभावाप्रमाणे आपल्याला या समस्येचा ‘मुळा’पासून अभ्यास करावा लागेल म्हणजे आपली एक ठाम भूमिका तयार होईल. तर हा लेखनप्रपंच त्याचं दिशेने केलेला अल्पसा प्रयत्न. पण तो थोडा हटके स्वरुपात.
हे आपण करणार आहोत प्रश्न उत्तरांच्या स्वरुपात. मी काही प्रश्न पोस्ट करीन. यावर दोन-तीन दिवस थांबून त्यांची उत्तरे, त्याबद्दलची माहिती, सद्यस्थिती अशी एक पोस्ट करीन. मधल्या दोन-तीन दिवसात आपला सहभाग अपेक्षित आहे. अभ्यासपूर्ण, तिरकस, मार्मिक आणि इरसाल उत्तरे/सूचना येणार याची खात्री आहेच. आणि त्यातली काही मासलेवाईक उत्तरे नावांसकट पुढील पोस्टमध्ये असतील. मग पुढील प्रश्नाची पोस्ट येईल आणि असा हा प्रवास चालू राहील. यातून काहीजणांना जरी नदीबद्दल अधिक प्रेम निर्माण झालं, नदीची स्थिती सुधारण्यासाठी काही करावसं वाटलं, कृतीला काही दिशा मिळाली तर हा प्रयत्न सुफळ संपूर्ण झाला असं मी समजेन. असो.
तर पहिल्या काही सोप्या प्रश्नांपासून सुरुवात करू – आपण पुणेकर नक्की कोणत्या नदीचे पाणी पितो? मुळा कि मुठा? पुण्यात किती नद्या आहेत? पुण्याला पाणीपुरवठा करणारी कोणती धरणे आहेत? ती धरणे कोणत्या नदीवर बांधलेली आहेत?
चला तर मंडळी पटापट उत्तरे द्यायला सुरुवात करा. गुगल गुरुजी काय म्हणतात ते बघा. तुम्हाला काय वाटते ते सांगा.
-मनीष घोरपडे (एक नदीप्रेमी पुणेकर)
Leave a Reply