For Living Rivers
Pawana at source

For Living Rivers

Add Your Heading Text Here

 सन १९५०च्या सुमारास ब्रिटनच्या जैविकदृष्ट्या मृत म्हणून घोषित केलेल्या ‘थेम्स’ नदीत गेल्या वर्षी ‘हार्बर सील’ प्रजातीच्या १३० पेक्षा जास्त पिल्लांचा जन्म झाला याबद्दल सप्टेंबर २०१९ मध्ये विविध वृत्तपत्रे व इंटरनेटवर झळकलेली विस्तृत बातमी नक्कीच आशादायी आहे. तेथील थेम्स नदी ही मानवनिर्मित प्रदूषणाच्या विळख्यात अडकून इतकी खराब झालेली होती की १९५० साली त्या नदीमधील प्राणवायु (Dissolved Oxygen) ची पातळी शून्यावर येऊन नदीतील जीवसृष्टीच संपली त्यामुळे त्या नदीला मृत घोषित करावे लागले होते. परंतु ब्रिटिश सरकारच्या सुमारे पन्नास वर्षांच्या अथक प्रयत्नांमुळे आणि मुख्यत्वे त्या जोडीला मिळालेल्या नागरिकांच्या सहकार्यामुळे या नदीला पुनर्जीवित करणे शक्य झाले. याचाच अर्थ तेथील सरकारने नियमांची कडक अंमलबजावणी केल्यामुळे व त्यास नागरिकांचा सक्रिय पाठिंबा मिळाल्याने त्या मृत नदीचे पुनर्वसन करणे शक्य झाले. मग नेमकी हीच गोष्ट भारतात का शक्य होत नाही? असा विचार साहजिकच मनात येतो.

Kids swimming in Pawana river

Kids Swimming in Pawana river

 महाराष्ट्राची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला तसेच महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याला पंचनद्यांचे वरदान लाभले आहे ह्याची जाणीव तेथील नागरिकांनादेखील नाही आणि काहीजणांना जाणीव असली तरी नदीबद्दल जिव्हाळा वाटावा अशी परिस्थिती राहिलेली नाही. कारण नदी या परिसंस्थेबद्दल आत्मीयता वाटावी इतकी सुंदर व स्वच्छ नदी आम्ही शहरात ठेवलेली नाही.

तिचे उगमस्थानातले मूळचे शुद्ध व सुंदर स्वरूप आपण ती शहरात प्रवेश करताच पुरते बिघडवून ठेवून तिला विद्रुप करून टाकले आहे. ही बाब भारतातल्या शहरांमधील बहुसंख्य नद्यांना लागू होते.


आजमितीला भारतातल्या शहरांमधील नद्या पूर्णपणे मृत किंवा मृतवत झालेल्या दिसून येतात. या नद्यांमधील प्राणवायुची पातळी दोनच्या खाली किंवा अगदी शून्यावर गेलेली आढळते.

नद्यांच्या विशिष्ट अधिवासानुसार नद्यांमध्ये आढळणारे जलचर, पाणवनस्पती अशी जीवसृष्टीच आता उरली नसल्यामुळे वरकरणी वाहती वाटणारी नदी ही खरं म्हणजे निर्जीव मलवाहिनी झालेली आहे. नदीच्या पाण्यात कारखान्यातील प्रक्रिया न केलेले दूषित पाणी तसेच घातक रसायने, विषारी वायु, प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि प्लॅस्टिकसारखा अविघटनशील कचरा अमर्याद प्रमाणात वाढल्यामुळे नदीची स्वतःच स्वतःचे शुद्धीकरण करण्याची उपजत क्षमताच मानवाने  भयानक प्रदूषण करून काढून घेतलेली आहे.

याशिवाय नदी पात्र बुजवून केलेले बांधकाम, नद्यांचा प्रवाह हवा तसा वळवून केलेले बांधकाम, नदीपात्रात किंवा नदीच्या काठावर केलेले बांधकाम अशा सर्व प्रकारांमुळे आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला आहे. 

नदी या निसर्ग घटकाचा ‘वाहणे (Flow)’ आणि ‘पूर येणे (Flood)’ हे दोन मूळ स्वाभाविक गुणधर्म विचारात न घेता सातत्याने अविवेकशील कृत्ये करत राहिल्यामुळे आपण निसर्गाची आणि पर्यायाने आपली स्वतःचीच हानी करून घेत आहोत. स्पष्ट केलेली निळी व लाल पूररेषा यांचा आदर न राखल्यामुळे तसेच नदीचे नदीतटीय क्षेत्र (Riparian zone) पूर्णतः नष्ट केल्यामुळे नद्यांचा नाश आपणच ओढवून घेतला आहे. या नदीतटीय क्षेत्रात उंबर, वाळुंज, जांभूळ, अर्जुन, परळ, करंज अशा वनस्पती असतात ज्यांमुळे नदीचे प्रदूषण रोखले जाते. नदीतटीय क्षेत्रच नष्ट केल्यामुळे साहजिकच त्यामधील या वनस्पती पण नष्ट केलेल्या आहेत.

याशिवाय बेकायदेशीररित्या नदीच्या तळाचे उत्खनन करून तेथील वाळूचा भरमसाठ उपसा केल्यामुळे नदीपात्रात असमतोल घडवून आणल्याची भयानक किंमत आपल्यालाच मोजावी लागत आहे. कित्येक ठिकाणी नदीच्या दोन्ही किनाऱ्यांवर कृत्रिम तट बांधून नदीपात्र अरुंद व लांब केलेले आढळून येते. अशी दोन्ही काठ बांधून ठेवल्यामुळे रोडावलेली नदी तर अगदी करुण वाटते. नद्या गाळ वाहून आणतात व आजूबाजूचा प्रदेश सुपीक करतात ही गोष्ट आता इतिहासजमा होते की काय असे वाटू लागले आहे कारण अलिकडे नद्या गाळाऐवजी प्लॅस्टिकसारखा अविघटनशील कचरा वाहून आणत आहेत.

Sand excavation from river

Mound of excavated sand from rover

भारतातल्या या मृत किंवा मृतवत झालेल्या नद्यांना पुन्हा जीवित करण्यासाठी भारत सरकारने नदीविषयक नियमांची कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.

याशिवाय सामान्य नागरिकांनी सतत सरकारला दोषी न ठरवता स्वयंप्रेरणेने नदी स्वच्छतेबद्दल आपलेच आपण नैतिक बंधन घालून घेणे महत्वाचे आहे. आपल्या गावातील नदी ही आपली जीवनदायिनी आहे या भूमिकेतून नदीकडे पाहिल्यास तिच्या रक्षणाची व संवर्धनाची जबाबदारी आपसूकच स्वीकारली जाईल.

नदीत प्लॅस्टिकसारखा अविघटनशील कचरा न टाकणे (किंबहुना नदीत कोणताच कचरा न टाकणे आणि स्वतः आपल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणे), शेतात विषारी रासायनिक खते व कीटकनाशके न वापरता सेंद्रिय शेतीकडे वळणे, घरात घातक रसायनांचा वापर टाळणे, अधिकाधिक सेंद्रिय अन्न सेवन करणे व जीवनशैली अधिकाधिक विषमुक्त करणे असे साधे उपाय अवलंबल्यास हळूहळू का होईना नक्कीच नदी प्रदूषणासंदर्भात सकारात्मक बदल घडून येतील.

Mutha river Nanasaheb Peshwa samadhi during floods

Mutha river Nanasaheb Peshwa samadhi during floods

ऐसपैस विस्तारलेली नदी
मनमोकळी वाहते |
खळखळाटी हास्य करत
भवतालचा परिसर सुपीक करते ||१||

नदीच्या पोटात जगतात
असंख्य जलचर-पाणवनस्पती |
पाण्यावर व काठावरसुद्धा नांदतात
अनेकविध प्राणी-पक्षी-वनस्पती ||२||

जीवित नदी ही खरी
समृद्ध परिसंस्था |
जीवनदायिनीबद्दल वाटे
सगळ्यांनाच आस्था ||३||

अलिकडे मात्र
चित्र सारे पालटले |
जिवंत नदीला
गालबोट लागले ||४||

मानवनिर्मित प्रदूषणाने
नदी बनली मलवाहिनी |
नष्ट होऊ लागले जीव
एकाकी झाली जलवाहिनी ||५||

आपण सारे अंतरी
एकच ध्यास घेऊ |
नदीला स्वच्छ करून
गतवैभव मिळवून देऊ ||६||

प्रिया फुलंब्रीकर 
जीवितनदी संस्थापक सदस्य व कार्यकर्ता,

संस्थापक – Green Bird Initiative

Green Bird Initiative Facebook page

Green Bird Initiative Youtube Channel

Leave a Reply

Leave a Reply

  Subscribe  
Notify of