आमचे सर, ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ श्री. प्रकाश गोळे; त्यांनी 1982-83 मध्ये पुण्यात मुळा-मुठा नद्यांचा अभ्यास केला, आणि त्यांच्या संवर्धनासाठीचा आराखडा तयार करून, पुणे महानगर पालिकेला सादर केला.
आम्ही जीवितनदी गट सुरु केला तेंव्हा गोळे सरांचा आराखडा हाच आमच्या कामाचा पाया होता. सरांचा आराखडा वाचायचा, समजून घ्यायचा, सद्य-स्थितीचा अभ्यास करायचा आणि त्याप्रमाणे नवीन आराखडा तयार करून महानगर पालिकेला सादर करायचा असा आमचा मार्ग ठरलेला होता.
आता वळून बघताना वाटते, किती सोप्या होत्या तेंव्हा गोष्टी. खूप खोलवर जाऊन अजून अभ्यास केला नव्हता. ही समस्या आहे – त्यावर हा उपाय आहे. म्हणजे आपण तो उपाय केला की समस्या संपली; गणित इतके साधे आहे असे वाटत होते.
नदीसाठी काहीतरी करायचे आहे एवढीच इच्छा घेऊन काही अस्वस्थ लोक एकत्र आले आणि जीवितनदी गटाची सुरुवात झाली. काहीतरी करायचे आहे एवढेच माहित होते. तेंव्हा अत्यंत गोंधळलेली अशी अवस्था होती. मग सरांच्या आराखड्याचा अभ्यास सुरु झाला आणि एक दिशा मिळाली.
नदीची सद्य परिस्थिती समजून घेण्यासाठी नदीला भेट देणे सुरु केले. सरांनी आराखडा तयार केला तेंव्हा पुणे महानगर पालिकेची हद्द विठठलवाडीपासून सुरु होऊन बंडगार्ड्नपाशी संपत होती. म्हात्रे पूल बांधायची योजना झाली होती. त्याला नाव तर नंतर मिळाले, त्यामुळे सरांच्या आराखड्यात, त्याचा “new bridge construction at Dattawadi” असा उल्लेख होता. एस. एम. जोशी पूल आहे तिथे कॉजवे होता, गरवारे कॉजवे.
अशा तर्हेने संदर्भ लावत, त्यावेळच्या परिस्थितीची कल्पना करत, सद्य परिस्थितीचा अभ्यास सुरु झाला. त्याच वेळी डॉ. वा. द. वर्तक ह्यांचा 1954 सालचा “Flora of Mutha” पेपर मिळाला, जो गोळे सरांनी संदर्भ् म्हणून त्यांच्या 1982-83 अभ्यासात वापरला होता. त्यांनी दत्तवाडी परिसराचे केलेले वर्णन आत्ता वाचताना अद्भूतच म्हणावे लागेल.
किती नैसर्गिक ठेवा आपण ह्या काळात गमावलाय ह्याची सतत जाणीव होत होती. नदीला बांधलेला कॉन्क्रिटचा काठ, नागमोडी वाहणार्या नदीला सरळ करायचा केलेला प्रयत्न, तिच्या काठावरच्या जैवविविधतेच नाश; हे सगळेच उद्विग्न करणारे होते.
आणि इथे एक परत गोंधळलेली स्थिती निर्माण झाली. गोळे सरांनी केलेला आराखडा सखोल अभ्यासातून झाला होता, अगदी सोप्या, कमी खर्चिक योजना सरांनी सुचवल्या होत्या. त्यांनी तो आराखडा पुणे म. न. पा. ला सादर केला. पण पुढे काय झाले? काहीच नाही. प्रशासनाने त्याची अम्मलबजावणी केलीच नाही.
मग आपण सदयस्थितीचा आढावा घेऊन आराखडा केला, तर त्याचे भवितव्य काही वेगळे कसे असू शकेल?
अशाच एका चर्चेत एक सदस्य म्हणला, की अरे, जो तो उठतो आणि नदीच्या ह्या अवस्थेबद्दल महानगरपलिकेला शिव्या घालतो. नदीत कचरा काय महानगरपालिकेचे कर्मचारी टाकतात का, पूलावरून नदीत कचरा टाकणारा हात सामान्य नागरिकांचाच आहे ना. प्रशासनाला सर्रास शिव्या घालणार्याना त्यांची पिशवी नदीत दिसत नाही का?
लोकान्मध्ये नदीबद्दल एवढी उदासीनता असेल तर प्रशासनाच्या योजनेत तिला अग्रक्रम कसा मिळेल? आपल्या घराजवळ जर कोणी कचरा टाकला तर आपण तक्रार करतो. त्यामुळे रस्ते, गल्ली-बोळ झाडणे ह्याला पालिकेकडून आपोआपच प्राधान्य मिळते. नदीमध्ये कचरा असेल तर कोणालाच काही फरक पडत नाही. नदीसाठी ठामपणे उभे राहणारे, भांडणारे कोणीच नाही. मग नदी, नदीपात्र घाण असले तर असो, काय फरक पडतो, अशी भूमिका प्रशासनाची असते.
टेमघर आणि खडकवासला येथे जाऊन, तेथे नदी कशी आहे, आजूबाजूचा प्रदेश, जैवविविधता ह्याचा अभ्यास केला होता. पुण्यात प्रवेश करणारी नदी, आणि पुण्यातील नदी ह्यात खूप फरक आहे.
पुणे शहरात प्रवेश करण्यापूर्वीची मुठा, मुठे गावात
पुणे शहरातील मुठा, सिद्धेश्वर मंदिर येथे..
म्हणजे जबाबदार कोण आहे? तर पुणे शहर, म्हणजे पुण्यात राहणारे आपण सर्व. त्यात नागरिक ही आले, स्थानिक प्रशासनही आले.
म्हणजे आपल्याला जे काम करायचे आहे ते पुणे शहरात हे नक्की झाले.
नदी संवर्धन आराखडा तयार करणे हे गरजेचे होतेच. पण पुरेसे नव्हते हे लक्षात आले.
लोकांना नदीजवळ आणणे, नदीबद्दल आस्था निर्माण करणे, शहराचे नदीशी तुटलेले नाते परत जोडणे; नदीचा विचार करणारा, नदीसाठी वेळ प्रसंगी लढण्यास तयार असणारा एक दबाव गट निर्माण करणे हे नवे उद्दिष्ट झाले.
आरखडा तयार करण्याचे उद्दिष्ट सोपे नसले तरी तसे सरळ होते. नक्की काय करायचे आहे हे त्यात स्पष्ट होते. त्यासाठी गरजेचे ज्ञान गटात होते, गरज पडली तर तज्ञांचे मार्गदर्शन घेणे शक्य होते.
हे नवीन उद्दिष्ट तसे नव्हते. कुठलाच road-map त्यासाठी उपलब्ध नव्हता. परत “काहीतरी करायचे आहे, पण नक्की काय हे माहित नाही” ह्या अवस्थेतून प्रवास सुरु झाला.
अशी गोंधळेली अवस्था आणि त्यातून काढलेला मार्ग, असे ट्प्पे पुढेही अनेक वेळा आले. जेंव्हा आपण करतोय ते कितपत परिणामकारक आहे, ह्यात काही बदल करावा का असे विचार येतात, गोंधळ उडतो, आणि मग वाटते अरे, इतके दिवस आपण काम करतोय, त्यात साध्य काय झाले. अशीच गोंधळलेली स्थिती तर गट सुरु करतानाही होतीच. मग परत तिथेच आलो की काय आपण.
पण तसे नसते. Spiral जिना असतो ना, वळण घेत जाणारा, तो चढताना कसे, आपण एक आवर्तन पूर्ण करतो आणि आजूबाजूला बघितले तर वाटते अरेच्चा, परत तिथेच आलो. पण तसे नसते. आपण एक पातळी वर असतो. आधी होतो त्यापेक्षा अनेक नवीन गोष्टी नजरेच्या टप्प्यात आलेल्या असतात. आपले क्षितिज रुंदावलेले असते. पण प्रकर्षाने एवढेच जाणवते की आधी होतो, तेथून जे दिसत होते, तेच आत्ताही दिसत आहे, मग आपण नक्की प्रगती केली की नाही.
त्या टप्प्यापासून ह्या टप्प्यापर्यंतच्या प्रवासात, नवीन गोष्टी कळलेल्या असतात. नवीन मिळालेल्या ज्ञानाच्या प्रकाशात आधीची गृहितके तपासून बघावी लागतात. त्यात विसंगती आढळली तर आधीच्या योजना निकालात काढून नवीन योजना आखाव्या लागतात. ते अपयश नाही. किंवा परत पहिल्या पायरीपासून सुरुवात करणे नाही. एडीसन म्ह्णला होता तसे आहे. मी अपयशी झालो नाही. तर ह्या 999 पद्धतीमुळे light bulb तयार होऊ शकत नाही हे मला उमगले.
आपली गृहितके तपासून, गरज पडल्यास मार्ग बदलणे, course-corrections, हे अपयश नाही. ह्या मार्गाने उद्दिष्ट साध्य होऊ शकते हे जसे ज्ञान आहे. तसेच ह्या मार्गाने ते साध्य होऊ शकत नाही हे कळणे ही ज्ञानच आहे, अपयश नाही. हे ज्ञानही आपल्याला आपल्या उद्दिष्टाजवळ नेत असते, फक्त ते त्यावेळी जाणवत नाही एवढेच.
कधी कधी तर आपल्याला जे उद्दिष्ट वाटत होते ते कितपत बरोबर होते हासुद्धा प्रश्न निर्माण होतो. अशा वेळी, कायम आपण कामाला सुरुवात का केली हे आठवायचे. जसे आमच्या बाबतीत, पुण्यात मुळा-मुठा नद्या जीवित करणे हे आमचे अंतिम ध्येय आहे. त्यासाठी छोटे छोटे टप्पे आहेत, त्या प्रत्येक ट्प्प्याला उद्दिष्टे आम्ही ठरवली आहेत. त्यामुळे एखादे उद्दिष्टच चुकले, किंवा ते ग़ाठण्यासाठी ठरवलेली योजना चुकली तरी शेवटी जे करतोय ते नदीसाठी हे लक्षात ठेवले, तर वाटचाल सुरु ठेवणे सोपे होते.
अदिती देवधर- संस्थापक, सदस्य, जीवितनदी – लिव्हिंग रिव्हर फाउंडेशन
Featured Image courtesy: Mr. Subhash Deshpande
Leave a Reply